पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाची करवसुली मार्चअखेर नंतरही सुरू आहे. सद्यस्थितीत ऑनलाइन कर भरण्यास नागरिकांची पसंती आहे. मागील तीन वर्षांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तर मागील बारा वर्षांमध्ये यामध्ये 43 टक्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी तब्बल 2 लाख 2 हजार 773 नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. सद्यस्थितीत साडेपाच लाखाहून अधिक मालमत्ता शहरामध्ये आहे. दरवर्षाला शेकडो मालमतांची भर पडत आहे. पर्यायाने महापालिकेच्या मालमत्ता करात वाढ होत आहे. नागरिकांना करभरणा सहज करता यावा यासाठी महापालिकेची शहरात 15 करआकारणी व करसंकलन विभागीय कार्यालये आहेत. आगाऊ करभरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांना करामध्ये दहा टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे आगाऊ करभरणा करण्याकडे नागरिकांचा कल असतो. तसेच महापालिकेने ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सन 2009-10 या अर्थिक वर्षांमध्ये फक्त 3 हजार 835 नागरिकांनी ऑनलाइन कर भरला होता. हे प्रमाण अवघे 2.06 टक्के होते. 2014-15 या अर्थिक वर्षांपासून यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी 61 हजार 913 जणांनी ऑनलाइन कर भरला होता. त्यांचे प्रमाण 16.67 टक्के होते. तर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून यामध्ये आणखी मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना घरबसल्या एका क्लिकवर कर भरता येतो. त्यांच्या बॅंक खात्यातून सुलभपणे पैसे कट होऊऩ महापालिकेच्या खात्यावर जमा होतात. त्यामुळे नागरिकांना कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत नाही. गतवर्षी म्हणजेच 2020-21 यावर्षी 1 लाख 85 हजार 236 जणांनी तर यावर्षी तब्बल 2 लाख 2 हजार 773 जणांनी ऑनलाइन कर भरला आहे.