पुणे -ठराविक लोकांना डोळ्यांसमोर ठेऊन मोजकेच रस्ते रूंद न करता, संपूर्ण शहरासाठी याबाबत एकच निर्णय घ्यावा. त्यासाठी सुधारित प्रस्ताव दाखल करावा, अशा सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिल्या. तसेच बहुमताच्या जोरावर चुकीचा निर्णय घेतल्यास राज्यशासनाच्या माध्यमातून गंभीर विचार करावा लागेल, अशी तंबीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
शहरातील 323 अरुंद रस्ते 9 मीटर करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. यामुळे या रस्त्यांवर टीडीआर वापरता येणार आहे. मात्र, प्रशासनाने हा प्रस्ताव ठराविक बांधकाम व्यावसायिकांनाच डोळ्यांसमोर ठेऊन आणल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना यांनी करत, प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, मनसेचे वसंत मोरे यांनी पवार यांची शनिवारी भेट घेतली. आयुक्त गायकवाड हेदेखील उपस्थित होते.
“हा निर्णय ठराविक व्यक्तींना डोळ्यांसमोर ठेऊन घेण्यात आला आहे. तो सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आणण्यात आला आहे,’ अशी तक्रार या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर याची गंभीर दखल घेत पवार यांनी, “करायचे तर सर्वच रस्ते सरसकट रुंद करण्याचा निर्णय घ्या. मध्यवस्तीमधील रस्त्यांचा यामध्ये समावेश नाही. त्याबाबतही धोरण तयार करा,’ अशी सूचना आयुक्तांना केली.