सातारा -येथील राजवाडा परिसरातील तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये सुमारे 36 हजार रुपये किमतीचा गुटख्याचा साठा शाहूपुरी पोलिसांना सापडला असून, याप्रकरणी नौशाद इमामुद्दिन मोदी, सद्दाम नौशाद मोदी (रा. शनिवार पेठ, सातारा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तांदूळआळीमध्ये एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी दुपारी पोलिसांचे एक पथक तेथे पाठविले. या पथकाने तांदूळआळीतून समोरून येणाऱ्या कारला अडवले. कारची तपासणी केली असता प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारसह 1 लाख 86 हजारांचा ऐवज दोघांकडून जप्त केला. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.