रस्ता खोदणाऱ्या ठेकेदाराचा अखेर माफिनामा

रस्ता दुरुस्ती न केल्यास कारवाईस सामोरे जाण्याचे लेखी ः कचरेंकडून पोलिसांत तक्रार

नेवासा – तालुक्‍यातील लेकुरवाळा आघाडा ते पुनतगावदरम्यान डांबरी रस्त्याचे नुकसान करून ऍप्टिकल फायबर केबल टाकण्याचे काम ठेकेदाराकडून सुरू होते. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याने काम सुरूच ठेवले. याबाबत दैनिक प्रभातने वृत्तही प्रसिद्ध केले होते. अखेर याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात रस्ता ठेकेदाराने तक्रार दाखल केल्यानंतर या ऑप्टिकल फायबर केबल ठेकेदाराने माफीनामा लिहून दिला असून, रस्ता दुरुस्त करून न दिल्यास कुठल्याही कारवाईस सामोरे जाण्याची तयारी संबंधिताने दर्शविली आहे.

तालुक्‍यातील मौजे लेकुरवाळा आखाडा ते पुनतगाव पाचेगाव या रस्त्याचे मागीलवर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आले आहे. या परिसरातील ग्रामपंचायतींना जलद इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी महानेट ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचा ठेका बंगळुरू येथील आईटीआई कंपनीला देण्यात आला होता. मागील 15 दिवसांपासून संबंधित ठेकेदाराकडून पुनतगावमध्ये खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू होते.

परंतु संबधित रस्त्यापासून ठरवून दिलेल्या अंतरावर खोदाई करून केबल टाकणे अपेक्षित होते. मात्र या ठेकेदाराने डांबरी रस्त्याच्या साइडपट्ट्यांची खोदाई करून त्यातूनच ही केबल टाकण्यास प्रारंभ केला. याबाबत नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक धनगे यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता पेशवे यांच्याकडे केली होती.

त्यानंतर पेशवे यांनी शाखा अभियंता शेखर गुंजाळ व सदर डांबरी रस्त्याचे काम करणारे ठेकेदार बाळासाहेब कचरे यांना रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. संबंधितांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर केबल टाकणाऱ्या ठेकेदारास काम थांबविण्याचे सांगितले. मात्र तरीही नियमबाह्य पद्धतीने केबल टाकण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे रस्ता ठेकेदार कचरे यांनी केबल टाकणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

त्यात केबल ठेकेदाराने रस्त्याच्या केलेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तरीही काम सुरूच असल्याने शाखा अभियंता गुंजाळ व कचरे यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन केबल टाकणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी केली होती.

त्यावर महानेटचे ठेकेदार नितीन बाळकृष्ण भाकरे यांनी पोलीस ठाण्यास माफीनामा सादर केला. यावेळी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्याकडून केबल टाकण्याचे काम सुरू असताना साइडपट्ट्या, सूचना फलक, गार्डस्टोन, छोटी मोरी, पूल, रस्त्याचा डांबरी पृष्ठभाग याचे नुकसान झाले असून, 15 दिवसांत नुकसान झालेल काम पूर्ण करून देण्यात येईल. तसेच 15 दिवसांत रस्ता दुरुस्ती न केल्यास आपल्यावर जी कारवाई करण्यात येईल, ती मान्य असेल, असे पत्रात नमुद केले आहे.

याबाबत तालुक्‍यात झालेल्या नवीन डांबरी रस्त्यांचे कुणी नुकसान करीत असेल व त्याच्यावर कारवाई होत नसेल, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. या कामाबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशित केल्यावर ही कारवाई झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.