कोकणाकडे जाणारा रस्ता ‘खड्ड्यात’

‘एमएसआरडीसी’चे दुर्लक्ष; शहर-ग्रामीणला जोडणाऱ्या हद्दीतील 200 मीटर काम रखडले

कोथरूड – कोकणाकडे जाताना एस.टी.ने प्रवास म्हणजे हाडे अक्षरश: खिळखिळी व्हायची, नंतरच्या काळात रस्ते काहीसे सुधारले, दळव-वळणाच्या सुविधा वाढल्याने हा प्रवास काहीसा सुखकर झाला. परंतु, भुगावात आल्यानंतर आता पुन्हा असा अनुभव प्रवाशांना येऊ लागला आहे.

मुळशी मार्गाच्या नव्याने होत असलेल्या मुळशी-ताम्हीणी रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरू करण्यात आले आहे. परंतु, शहर आणि ग्रामीण हद्दीचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव येथे 200 मिटर रस्त्याचे काम “जैसे थे’ असून हा रस्ता “खड्डयात’ गेला आहे. .

मुळशी-ताम्हीणी रस्त्याचे दोन्ही बाजूचे कॉंक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, भूगावात हद्दीत 200 मीटरचे काम रखडले असून याच ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. येथील रस्त्याचे काम करण्यात एमएसआरडीसीला काय “वावडे’ आहे? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

करोनामुळे या रस्त्याचे काम काही महिने बंद होते. आता, काम सुरू झाले असले तरी ते संथगतीने होत आहे. त्यातही “आता इथं तर उद्या तिथं’, असे कामाचे नियोजन आहे. पुणे शहर हद्द ओलांडताच भूगाव या गावापासून ग्रामीणची हद्द सुरू होते. याठिकाणी रामनदीचा पूल आहे. शहर आणि ग्रामीणला जोडणाऱ्या साधारण 200 मीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही.

खराब असलेला रस्ता चढाचा आहे. याठिकाणी मोठे खड्डे असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पर्यायी रस्ता नसल्याने येथील काम तात्काळ मार्गी लावणे आवश्‍यक आहे.
– कुणाल वेडे पाटील, अध्यक्ष, राष्ट्रवादी युवा, खडकवासला मतदारसंघ


कोकणात जाणारा हा मार्ग असल्यामुळे वाहतुकीची वर्दळ अधिक असते. रस्ता खराब आणि खड्डेमय असल्यामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि कोंडी होते. लग्नसराईमध्ये याठिकाणी वाहनांच्या रांगा लागतात.
– राजाभाऊ जोरी, माजी उपाध्यक्ष, भाजपा पुणे 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.