मुंबई – गोळीबार केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या 30 वर्षीय व्यक्तीकडून जप्त केलेले पिस्तूल प्रत्यक्षात सिगारेट पेटविण्याचे लायटर निघाले. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करण्यात आला.
या आरोपीने गोळीबारासाठी वापरलेले पिस्तूल सिगारेट लायटर असल्याचे न्यायवैद्यक अहवालात नमूद केले आहे, असे न्यायलयाने स्पष्ट केले. वांद्रे येथील फरहान असगर सईद यांना या प्रकरणात 30 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटक करण्यात आली. यापूर्वी त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्याने हा दुसरा अर्ज केला होता. त्यावर सुनावणीत त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला.
45 लाख रुपयांचे देणे नाकारल्याने एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार केल्याच्या आरोपावरून त्याला 29 नव्हेंबरला अटक करण्यात आली होती. अर्जदाराने कोणतेही पिस्तूल वापरले नाही. ना त्याच्याकडे असे कोणतेही पिस्तूल होते. पोलीस प्रशासनाने त्याच्याकडून पिस्तूलाच्या आकाराचे लायटर जप्त केले आहे, असे सईदचे वकील अशोक सारोगी यांनी न्यायालयात सांगितले.
पोलिसांनी त्याच्या जामिनाला विरोध केल्यानंतर सारोगी म्हणाले, सुरवातीला तपास प्राथमिक अवस्थेत असल्याचे सांगत जामीन नाकारण्यात आला आहे. त्यावेळी न्यायवैद्यक अहवाल यायचा असल्याचे सांगण्यात आले आहे. आता जवळपास संपूर्ण तपास झाला आहे. तज्ज्ञांनी न्यायवैद्यक अहवाल दिला आहे.
घटनास्थळावर कोणताही सकारात्मक पुरावा आढळाला नसल्याचे न्यावैद्यक अहवालात म्हटले आहे. पोलिसांनी घटनास्थळावर जप्त केलेले पिस्तूल प्रत्यक्षात सिगारेट लायटर असल्याचे सारोगी यांनी सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, या बांधकाम व्यावसायिकाने सईद यांच्याकडून 45 लाख उसने घेतले होते. त्यासाठी काही धनादेश सईद यांच्या नावाने दिले. हे सर्व धनादेश वटले नाहीत. त्यावेळी सईद त्यांना भेटायला गेला. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सईदने त्याच्यावर आणि त्याच्या मेव्हण्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यानंतर भविष्यात पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर एकत्र चहा पिऊन सईद निघून गेला.