मुंबई – अभिनेत्री रिया चक्रवर्तीची आज सलग दुसऱ्या दिवशी अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या वतीने चौकशी करण्यात आली. काल सकाळी ती ‘एनसीबी’च्या कार्यालयात हजर झाल्यानंतर तब्बल 6 तास तिची कसून चौकशी केली गेली होती. आज सकाळी 9.30 वाजता ती ‘एनसीबी’च्या बालार्ड इस्टेट येथील कार्यालयात हजर झाली. तिच्या समवेत पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीसही होते.
सुशांतसिंह राजपूत मृत्यू संदर्भातील तपासादरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीचे धागेदोरे उघड झाले होते. त्याप्रकरणी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा आणि सुशांतचा वैयक्तिक कर्मचारी दीपेश सावंत यांना ‘एनसीबी’कडून अटक केली गेली आहे. त्यांच्या समोरच रियाची चौकशी करायची असल्याचे ‘एनसीबी’ने सांगितले होते. त्यानुसारच काल तिची चौकशी करण्यात आली होती.
‘एनसीबी’ने अनुज केश्वानी नावाच्या आणखी एकाला अटक केली आहे. याचप्रकरणी पूर्वी अटक करण्यात आलेल्या कायझान इब्राहिमच्या चौकशी दरम्यान केश्वानीचे नाव पुढे आले होते. केश्वानीशी संबंधित ठिकाणांवर घातलेल्या छाप्यादरम्यान हशिश, एलएसडी आणि मारिजुआना सारखे अमली पदार्थ आणि काही रोख रक्कमही सापडली होती.
आतापर्यंत याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी 7 जणांचा सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी थेट संबंध आहे. तर दोघा जणांना अमली पदार्थ विषयक गुन्ह्याच्या कायद्याखाली तपास सुरू केल्यावर अटक करण्यात आली आहे. यापूर्वी सीबीआय आणि ईडीकडूनही रिया चक्रवर्तीची चौकशी केली गेली होती.