अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची बातमी

पहिली फेरी पूर्ण : 1 लाख 346 विद्यार्थ्यांनी केली ऑनलाइन नोंदणी

पुणे- पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीसाठी प्रवेश घेण्याकरीता इच्छुक असलेल्या आत्तापर्यंत 1 लाख 346 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असल्याने आता विद्यार्थ्यांच्या नोंदणीत फारशी वाढ होण्याची शक्यता नाही.

या विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 6 हजार 775 प्रवेशाच्या जागा दर्शवण्यात आलेल्या आहेत. या प्रवेशासाठी आधी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आले होते. त्यानंतरच विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 व 2 भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

आतापर्यंत 83 हजार 662 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-1 भरला असून अर्ज लॉक करण्यात आलेले आहेत. त्यातील 83 हजार 254 अर्जांची तपासणीही पूर्ण झालेली आहे. 75 हजार 376 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-2 भरुन महाविद्यालयांचे पसंतीक्रमही नोंदवले आहेत. 30 हजार 560 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून 76 हजार 215 प्रवेश रिक्तच आहेत.

आता दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची प्रक्रिया 4 सप्टेंबारपासून सुरू झालेली आहे. दि.8 व 9 सप्टेंबर रोजी पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी अंतिम करण्याची कार्यवाही होणार आहे. 10 सप्टेंबरला या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 12 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात संबंधित महाविद्यालयात प्रवेश नोंदवता येणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.