अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजाने 2012 मध्ये लग्न केलं. दोघंही बॉलिवूडचे क्यूट कपलपैकी एक आहेत. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांसाठी असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करत असतात. पण बायकोशी झालेले गोड भांडण रितेशने नुकतेच ट्विटरवर आणल्याचे दिसून आले आहे. रितेशने ट्विटरवर पोस्ट केलेला एक मीम पाहून या दोघांमध्ये नेमक काय बिनसल आहे असा प्रश्न चाहत्यांनाही पडला आहे.
ट्विटरवर शेअर केलेल्या या मीममध्ये लिहिले आहे, प्रत्येक चिडलेल्या महिलेमागे एक पुरुष असतो, ज्याला त्याच्याकडून नेमकी काय चूक झाली याचीच कल्पना नसते. विशेष म्हणजे हा मीम शेअर करताना रितेशने जेनेलियाला टॅग केले आहे. रितेशच्या पोस्टवर जेनेलियानेही परत रितेशला टॅग करत म्हटल आहे की, ‘मी सर्वसामान्यपणे नवऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा देते तेव्हा तो चुकीचाच असतो.’
दोघांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. काही नेटिझन्सने लिहिले की, गृहक्लेश आता ऑनलाइन झाला आहे तर अजून एका युझरने ही तर प्रत्येकाच्या घरातली गोष्ट आहे अशी कमेन्ट केली.