नवी दिल्ली – टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. तो १४ महिन्यांनंतर क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये दिल्ली-डेहराडून हायवेवर झालेल्या भीषण कार अपघातानंतर पंत क्रिकेटपासून दूर होता. मात्र, आता पंतला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीच्या(एनसीए) फिजिओथेरपिस्टने पंतच्या बरे होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
एनसीएचे फिजिओथेरपिस्ट तुलसी म्हणाले की, ऋषभ पंतची मानसिक ताकद आणि जिम्नॅस्टिक खेळण्याचा अनुभवाने यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या पंतला दुखापतीतून लवकर बरा होण्यास मदत केली. ऋषभने उपचारांच्या काळात दाखविलेली मानसिक ताकद आणि आत्मविश्वासाने केलेल्या प्रयत्नांमुळे तो लवकरच मैदानावर परतू शकतो. त्याला पुनरागमन करायला दोन वर्षे लागतील असे डॉक्टरांना वाटत होते. परंतू एनसीएत आल्यावर तो झपाट्याने बरा झाला.
एनसीएमधील मधील स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच निशांत बोरदोलोई यांनी पंतला बालपणापासून असलेल्या जिम्नॅस्टीकच्या आवडीमुळे त्याला बरे होण्यास मदत झाल्याचे म्हटले.
“दुखापतीनंतर तंदुरुस्तीचा कालावधी खूप कंटाळवाणा होता. तेच-तेच काम पुन्हा-पुन्हा करत होतो व त्याशिवाय पर्यायही नव्हता. परंतू आता मैदानात परत आल्याने खूप आनंद झाला आहे. माझे क्रिकेटवरील प्रेम वाढले आहे. पूर्वी सुद्धा मी प्रेमात होतो परंतू आता ते द्विगुणीत झाले आहे.”
– ऋषभ पंत, भारतीय क्रिकेटपटू