पुणे – जमीन लाटण्यासह फसवणूकप्रकरणी मोक्का गुन्ह्यातील फरार असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. मागील दीड वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या बऱ्हाटेला अटक केल्यानंतर गुन्हे शाखेने सुटेकचा निःश्वास टाकला आहे.
त्याला पकडण्यासाठी विविध पथकांकडून खास प्लॅन करण्यात आला होता. खंडणी, फसवणूक आणि जमिन बळकाविण्याच्या 12 गुन्हयांमध्ये बऱ्हाटे दीड वर्षांपासून फरार आहे. त्यापैकी तीन गुन्ह्यामध्ये त्याच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी त्याने फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून पोलिसांवर आरोपी केले होते.
त्यानंतर पोलिसांनी बऱ्हाटेला मदत करणाऱ्याचा ठावठिकाणा शोधण्यास सुरूवात केली होती. त्यानुसार कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन पोलिसांनी बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि मुलगा मयूरला अटक केली. चौकशीत फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडिओसंदर्भात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.