श्रीहरीकोटा – भारतीय अंतराळ संस्था अर्थात “इस्रो’ आपल्या तिसऱ्या महत्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चार वर्षांपूर्वी चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शुक्रवारी भारताचे अंतराळ यान अवकाशात झेपावणार आहे. पणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे गाठण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. “एलव्हीएम3-एम4′ “फॅट बॉय’ या रॉकेटच्या माध्यमातून भारतीय अंतराळ यान चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणार आहे.
2019 मध्ये चांद्रयान-2 या मोहिमे अंतर्गत चंद्रापर्यंत पोचलेले अंतराळ यान चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरण्यास अयशस्वी झाले होते. त्यामुळे “इस्रो’चे सर्व संशोधक आणि तंत्रज्ञ निराश झाले होते. “इस्रो’चे तत्कालिन प्रमुख के. सिवन यांची स्वतः पंतप्रधानांनी समजूत काढली होती. मात्र आता आपले ध्येय गाठण्यासाठी सतिश धवन अंतराळ संशोधन केंद्रातील संशोधक गेल्या काही महिन्यांपासून अविश्रांत परिश्रम घेत आहेत. चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ अलगद उतरवल्यावर ही कामगिरी करणारा भारत अमेरिका, चीन आणि तत्कालिन सोव्हिएत रशियानंतरचा चौथा देश ठरणार आहे.
या मोहिमेत चंद्राच्या वातावरण कक्षेमध्ये पोचणे, लॅन्डरच्या मदतीने चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरणे आणि चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ यानातून रोव्हर यानातून उतरवण्याच्या उद्देशांचा समावेश असणार आहे. चांद्रयान-2 मध्ये लॅन्डर पृष्ठभागावर अलगद उतरण्याऐवजी अखेरच्या 2 फुटांच्या अंतरावरून कोसळले होते. त्यामुळे ती मोहीम अयशस्वी झाली होती. मात्र यावेळी कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी संशोधकांनी परिश्रम घेतले आहेत.
मंगळवारी श्रीहरीकोटा येथे प्रक्षेपणाच्या पूर्वतयारीची पूर्ण 24 तासांची रंगीत तालीम संशोधकानी घेतली आहे. शुक्रवारी दुपारी अडीच वाजता प्रक्षेपण झाल्यावर 16 मिनिटांनी प्रोपल्शन मॉड्युल रॉकेटपासून वेगळे होईल. त्यानंतर यान संपूर्ण पृथ्वीची 5-6 वेळा प्रदक्षिणा करेल.
त्यावेळी ते पृथ्वीपासून कमीत कमी 170 किलोमीटर आणि जास्तीत जास्त 36,500 किलोमीटर अंतरावरून प्रवास करेल. चंद्रापासून 100 किमी पर्यंत पोचेपर्यंत हा प्रवास सुरू असेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर निश्चित केलेल्या ठिकाणी ते खाली उतरू लागेल. दिनांक 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी लॅन्ड चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरेल, असे “इस्रो’च्या संशोधकांनी म्हटले आहे.
“एलव्हीएम3′ रॉकेटची चौथी मोहिम
चांद्रयान-3 ही चंद्राबाबतची तिसरी आणि “एलव्हीएम3′ रॉकेटची चौथी मोहीम असणार आहे. या मोहिमेनंतर भविष्यातील आंतरग्रहीय मोहिमेला मोठा लाभ मिळणार आहे. चांद्रयान-3 अंतर्गत भारतीय बनावटीचे प्रोपल्शन मोड्युल, लॅन्डर आणि रोव्हरचा समावेश असणार आहे. 43.5 मीटर इंचाचे हे रॉकेट 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता अवकाशात सोडले जाणार आहे.
या प्रश्रेपणाची उलट गणती गुरुवारपासून सुरू होणार आहे. आतापर्यंतच्या रॉकेटपेक्षा सर्वात अवजड आणि मोठे रॉकेट असलेले “एलव्हीएम3′ (पूर्वीचे जीएसएलव्ही एमके3)ला “इस्रो’च्या संशोधकांनी “फॅट बॉय’असे नाव दिले आहे. या रॉकेटने आतापर्यंत सलग 6 अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.