बॉलीवूडमधील दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे नुकतेच 30 एप्रिल रोजी निधन झाले होते. आज म्हणजे 4 सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांची मुलगी रिद्धिमा कपूरने सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत वडील ऋषी आणि आई नितू सिंह दिसत आहेत. यासोबत तिने आपल्या बालपणीचाही एक फोटो शेअर केला आहे.
रिद्धिमाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “पापा, ते म्हणतात की, जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीस गमावतो जिच्याशिवाय आपण जगू शकत नाही, तेव्हा आपले हृदय तुटून जाते. परंतु मला माहीत आहे की आपण या तुटलेल्या हृदयात राहता आणि नेहमीच राहाल. मला माहीत आहे की आपण आम्हा सर्वांना पाहात आहात आणि आपण आम्हाला दिलेल्या त्याच व्हॅल्यू सिस्टमसह आम्ही राहात आहोत का, याची खात्री करून घेत आहात.”
“आपण मला दयेचा अमूल्य ठेवा दिला. तसेच नात्यांचे महत्त्व सांगितले. मला प्रत्येक क्षणी आपली आठवण येते आणि मी तुमच्यावर सदैव प्रेम करत राहीन. हॅप्पी बर्थ डे.” अशी भावूक पोस्ट तिने चाहत्यांशी शेअर केली आहे.