पुणे : पर्वती पायथ्यालगत असलेल्या जनता वसाहतीतील कालव्यात भरधाव रिक्षा कोसळल्याची घटना रविवारी (दि. 30) रात्री घडली. रिक्षा चालक बेपत्ता असून अग्निशमन दलाकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अंधारामुळे शोधमोहिमेत अडथळे आले असून कालव्यालगतच्या रस्त्यावर भरधाव वेगाने निघालेल्या रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जनता वसाहतीतील कालव्यात रविवारी रात्री आठच्या सुमारास रिक्षा कोसळली. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, प्रदीप खेडेकर, तांडेल राजाराम केदारी, कोळी, सचिन जवंजाळे, महेंद्र सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जवानांनी शोधमोहिम राबविली. कालव्यालगत बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. प्रखर प्रकाशझोताचा वापर करून जवानांनी रिक्षाचा शोध घेण्यास सुरूवात केली. काही अंतरावर रिक्षा सापडली.
मात्र, रिक्षाचालकाचा ठावठिकाणा लागलेला नाही. रिक्षाचालक वाहून गेल्याची शक्यता असून अंधार पडल्याने शोधमोहिमेत अडथळा आल्याचे केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.