पुणे – जिल्ह्यात संगणक परिचालकांकडून विविध मागण्यांसाठी दहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याबाबत राज्य सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यामुळे हे आंदोलन दहाव्या दिवशी सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. यात बुधवारी (दि.28) महसूल कर्मचारी संघटनेकडून एक दिवसीय आंदोलन छेडल्यामुळे जिल्ह्यातील गावकारभार ठप्प झाला होता.
थेऊर, दि. 28 (वार्ताहर)-पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केल्याने जिल्ह्यातील महसूलची कामे ठप्प झाली. नागरिकांचा खोळंबा झाला. जिल्हाधिकारी कार्यालय, हवेली तहसील कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, अन्न धान्य वितरण कार्यालय, भूसंपादन अधिकारी कार्यालयात दिवसभर शुकशुकाट होता.
याप्रसंगी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, उपाध्यक्ष सचिन तारू, सचिन तांबोळी, विनायक राऊत, किशोर जाधव व वाहनचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ राठोड, नायब तहसीलदार, लिपीक, शिपाई, अव्वल कारकून इत्यादीसह जिल्ह्यातील कर्मचारी उपस्थित होते. पुणे जिल्हा कोतवाल संघटनेने महसूल कर्मचारी संघटनेस पाठिंबा दिला आहे.
नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा दिला आहे. ग्रेड पे मात्र वर्ग 3 चे देण्यात येते. लिपीक पदाचे महसूल सहायक असे पदनाम, सरळसेवा भरती प्रक्रियेत नायब तहसीलदार पदाचे प्रमाण 33 टक्क्यांवरून 20 टक्के करणे, अव्वल कारकून या संवर्गातील वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे, शिपाई संवर्गातून तलाठी पदावर पदोन्नत करणे, आदी मागण्या शासनाकडून तत्त्वतः मान्य झाल्या आहेत. त्याचा शासन निर्णय निर्गमित न झाल्याने जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकून धरणे आंदोलन केले.