…तर मग भारताने पाकिस्तानसाठी समुद्रमार्ग बंद करावा

सुब्रमण्यम स्वामी यांचा सरकारला सल्ला

नवी दिल्ली : भारताने काश्‍मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच तांडव सुरू केला आहे. भारतासोबतचे सर्वच संबंध तोडून काढत सरकारच्या निर्णयाचा पाकने निषेध व्यक्‍त केला आहे. त्यातच आता पाकिस्तानने कराची हवाई क्षेत्रातील तिन्ही मार्गांवरुन सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध आणखी बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकने केलेल्या बंदीवर राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी तोडगा सांगितला आहे. पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा सल्ला स्वामींनी केंद्र सरकारला दिला आहे. जर, पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रात बंदी घालू शकते तर भारतानेही समुद्री मार्ग बंद करावा असे स्वामी यांनी म्हटले आहे.

भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असा सल्ला सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. नमो सरकारला माझा सल्ला आहे की, जर पाकिस्तान भारतीय विमानांसाठी त्यांची हवाई हद्द बंद करु शकते तर भारतानेही अरबी समुद्रातून कराची बंदराकडे जाणाऱ्या बोटींवर बंदी घालावी असे स्वामी यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे. अरबी समुद्राचे नाव बदलण्याबाबतही स्वामी यांनी आपल्या ट्‌विटमध्ये भाष्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.