गणेश आंग्रे
पुणे – राज्यातील महसूल अधिकाऱ्यांकडील जमीनविषयक दावे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षांत राज्यात असे दावे दाखल करण्याच्या संख्येमध्ये 2 लाख 1 हजाराने वाढ झाली आहे. तर पुणे जिल्ह्यात 41 हजारांहून अधिक महसुली दावे दाखल झाले आहेत. विकासकामांमुळे जमिनींना आलेले सोन्याचे भाव, हद्दीचे वाद, सात-बारा उताऱ्यामधील चुका आदी कारणांमुळे महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत असल्याचे पुढे आले आहे.
महसूल अधिकाऱ्यांकडे अर्धन्यायिक प्रकरणे प्रलंबित आहेत. ती वेळेत मार्गी लावण्यासाठी सप्टेंबर 2015 मध्ये सरकारने अध्यादेश काढला होता. त्यानुसार जमीनविषयक दावे कमीत कमी सहा महिने ते जास्तीत जास्त एक वर्षाच्या आत हे दावे निकाली काढावेत, असे म्हटले आहे. असे असतानाही दावे दाखल होण्याची संख्या कमी होत नसल्याने दावे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढत आहे.
तहसीलदारांनी दिलेली निकालाविरोधात प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागता येते. प्रांताधिकारी यांच्याकडील निकालाविरोधात अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे आणि त्यानंतर अपर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव अथवा महसूलमंत्री यांच्याकडे दाद मागितली जाते. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर दाव्यांची संख्या वाढताना दिसते.
यांच्याकडे होतात दावे दाखल
जमिनीचा वाद, वारस नोंद, सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदणी, इतर हक्कातील नाव कमी करणे, कुळ कायदा नोंद, फेरफार रद्द करणे, जमिनीवरील शासकीय बोजा रद्द करणे, अशा अनेक प्रकरणांसाठी मंडल अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, अपर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव यांच्याकडे दाद मागितली जाते. राज्यातील 678 महसूल न्यायालयात एकूण 1 लाख 57 हजार 392 इतके जमीविषयक दावे प्रलंबित आहेत. तर पुणे जिल्ह्यातील 31 महसूल न्यायालयात 27 हजार 570 इतके महसूल दावे प्रलंबित आहेत.
…म्हणून दावे प्रलंबित
महसूल अधिकाऱ्यांकडे सुनावणीच्या कामकाजाबरोबरच इतर प्रशासकीय कामे, दौरे, बैठका, निवडणुका आदी कामे असतात. या कामांच्या जबाबदारीमुळे काळात सुनावणी होत नाही. त्यामुळे दाव्यांच्या सुनावणीसाठी आठवड्यातील दोन ते तीन दिवसच मिळतात. यामुळे दाव्यांना पुढीच तारीख दिली जाते. या सर्व कारणांमुळे दावे प्रलंबित राहत आहे.
राज्यातील स्थिती
वर्ष – 2021 – 2023
दाखल दावे – 5,11,567 – 7,13,031
निकाली दावे – 3,70,584 – 5,55,639
पुणे जिल्ह्यातील स्थिती
वर्ष- 2021 – 2023 दाखल दावे – 50,485 – 91,624 निकाली दावे – 28,317 – 64,054