रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – पुरंदर तालुक्यातील नागरिकांचा विमानतळाला विरोध असेल आणि विमानतळ करू नये अशी तेथील नागरिकांची भूमिका असेल तर विमानतळ खेड तालुक्यातील सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) मध्ये करावे जनतेच्यावतीने राज्यशासनाकडे आपली मागणी आहे. अशी माहिती खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज (दि.२३) पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
आमदार मोहिते म्हणाले, खेड तालुक्यात विमानतळाबाबत जे निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. पुरंदर तालुक्यात विरोध होत असल्याने ते विमानतळ खेड तालुक्यात झाल्यास आशादायक वातावरण तयार होईल. चाकण रांजणगाव भोसरी एमआयडीसी मधील उद्योजकांना व नागरिकांचा त्याचा निश्चित मोठा फायदा होईल.
तालुक्यातून नेलेले विमानतळ आम्हाला परत द्या. ही राज्यशासनाकडे आमची आग्रहाची मागणी आहे. समुद्रातही विमानतळ उभारली आहेत, अगदी हिमालयाच्या कुशीत विमानतळ झाली आहेत.एव्हढे तंत्रज्ञान पुढे गेले आहे. खेड तालुक्यात सेझ मध्ये विमानतळास कोणतीच तांत्रिक अडचण नाही. विमानतळास तालुक्यात तांत्रिक अडचण असल्याचे पुढे करणे योग्य नाही.सर्व तंत्रज्ञान वापरून खेड तालुक्यातच विमानतळ करावे अशी आग्रही मागणी आहे.