“कॉफी विथ यूथ’ कार्यक्रमास प्रतिसाद; विरोधकांवर जोरदार टीकास्त्र
कराड – पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात काय कामे केली, यापेक्षा त्यांनी मतदारसंघात किती रोजगार निर्माण केला, असा प्रश्न विचारतानाच, माझी ही शेवटची निवडणूक असून, मी यापुढे रिटायर होणार आहे, मला शेवटशी संधी द्यावी, असे भावनिक आवाहन करणाऱ्या नेत्याला युवकांनी आत्ताच घरी बसवावे, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भाजप-शिवसेना महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले, कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ येथील वेणूताई चव्हाण सभागृहात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने आयोजित केलेल्या “कॉफी विथ यूथ’ या कार्यक्रमात त्यांनी युवकांशी थेट संवाद साधला. दोन्ही उमेदवारांसह भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, बाळासाहेब यादव, सुदर्शन पाटसकर, धनंजय खोत, राहुल यादव, भूषण जगताप, तानाजी देशमुख, अनिकेत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास युवक-युवतींचा मोठा प्रतिसाद लाभला.
डॉ. सावंत म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही पुन्हा भाजपचे सरकार येणार आहे. युवकांनी परिवर्तनाच्या बाजूने मतदान करुन तरुणाईचा विचार करणाऱ्या अतुलबाबांना निवडून द्यावे. गांधी घराण्यावर अवलंबून असलेले नेतृत्व हद्दपार करावे.
उदयनराजे म्हणाले, देशाचे भवितव्य युवकांच्या हातात असून मतदान करताना देशहित डोळ्यासमोर ठेवावे. या देशात अनेक क्रांत्या युवकांनी केल्या आहेत, आताही योग्य निर्णय घेण्याची वेळ आहे. देशाला महासत्ता बनविण्यासाठी निवडणुका हातात घेणे हे युवकांचे कर्तव्यच आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी दहा वर्षांत काय काम केले? त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी विविध पदे भोगली; पण कराडच्या विकासासाठी तुमच्या कुटुंबाने नेमके काय केले? गेल्या 35 वर्षात तुम्ही काहीही करू शकला नाहीत.
आता तुम्ही काय करणार? डॉ. अतुल भोसले म्हणाले, मतदारसंघातील युवकांसाठी नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. युवक-युवतींसाठी कौशल्य विकास केंद्रे उभारण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केला जाईल. यापूर्वी बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन 751 जणांना एकाच दिवशी विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.