मुक्ता टिळक : पार्किंग, वाहतूक, जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार
पुणे – पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा असलेल्या महात्मा फुले मंडईच्या जुन्या इमारतीचे संवर्धन करून त्यात कोणताही बदल न करता उर्वरित मंडई परिसराचा पुनर्विकास करून या भागातील पार्किंग, वाहतूक तसेच जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी या भागातील व्यापारी तसेच व्यावसायिकांशी बोलताना दिली.
टिळक यांनी शुक्रवारी भाजी मंडई परिसरातील व्यावसायिक तसेच मतदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक नगरसेवक मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, सम्राट थोरात, आरती कोंढरे, अजय खेडेकर, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, छगन बुलाखे, संजय देशमुख, राजू परदेशी, प्रभागचे अध्यक्ष निलेश कदम, कीर्तन जगदाळे, दिलीप पवार, राजेंद्र काकडे, जयसिंग राजपूत यांच्यासह कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
मुक्ता टिळक यांना भरघोस मतांनी निवडून आणणार : शिवसेना
कसबा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे मुख्य घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. यावेळी कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांना भरघोस मतांनी निवडून आणणार असल्याचा विश्वास शिवसेनेचे कसबा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांनी व्यक्त केला.
कसबा हा युतीचा अभेद्य किल्ला आहे. भाजप-सेनेचे महाराष्ट्रातले पाहिले संपर्क कार्यालय हे आताचे खासदार आणि पूर्वश्रमीचे या मतदारसंघाचे आमदार गिरीश बापट यांनी सुरू केले. भाजप आणि सेनेचे कार्यकर्ते यांच्यात घट्ट नाळ जुळली आहे. त्यामुळे इथून युतीचाच उमेदवार आमदार म्हणून विधानसभेवर निवडून जाईल, असे शिवसेना नेते राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
निवडणूक प्रभारी सुहास कुलकर्णी, मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, सरचिटणीस प्रमोद कोंढरे, संजय देशमुख, सदानंद शेट्टी,शिवसेनेचे बाळासाहेब मालुसरे, माजी नगरसेवक विजय मारटकर, राजेंद्र शिंदे, दीपक मारटकर, विनायक धारणे, मनीषा धारणे, युवराज पारीख, अनिल जाधव यांच्यासह शिवसेना व भाजपचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.