मुंबई – भारतीय शेअर बाजारात रिटेल गुंतवणूकदारांची खरेदी वाढली असून आता शेअर बाजारातील एकूण गुंतवणुकीमध्ये रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा वाटा 9.7 टक्क्यावर गेला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी ज्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे त्या म्युच्युअल फंडाची शेअर बाजारातील गुंतवणूक 7.4 टक्क्यांवर गेली आहे. ही एकत्रित गुंतवणूक डिसेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार 17.1 टक्के इतकी झाली आहे.
डिसेंबर 2016 मध्ये रिटेल गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील गुंतवणूकीचा वाटा 13.9 टक्के होता. भारतामध्ये या अगोदर नागरिकांचा बचत दर जास्त होता. मात्र ही बचत वित्तीय उत्पादनामध्ये कमी वळत होती. मात्र करोनामधील लॉक डाऊनच्या काळामध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी शेअर बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे शेअर बाजारातील रिटेल गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा टक्का वाढत आहे. 3 डिसेंबर रोजी संपलेल्या बारा महिन्यांमध्ये तब्बल तीन कोटी डिमॅट खाती उघडली गेली आहेत. त्या अगोदरच्या वर्षांमध्ये केवळ एक कोटी डिमॅट खाती उघडली गेली होती.
त्यामुळे डिसेंबर 2021 नुसार डिमॅट खात्याची संख्या आठ कोटीच्या वर गेली आहे, तर मार्च 2022 मध्ये डिमॅट खात्याची संख्या दहा कोटीच्या पुढे गेली आहे. भारतामध्ये पॅन कार्डाशी संलग्न गुंतवणूकदारांची संख्या आठ काटी आहे. एका पॅन कार्ड धारकाला अनेक डिमॅट खाती काढता येतात.
गेल्या काही महिन्यापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातील गुंतवणूक काढून घेत असतानाच देशातील गुंतवणूकदार मात्र भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत आहेत. यामध्ये देशातील संस्थागत गुंतवणूकदाराबरोबरच किरकोळ गुंतवणूकदारांचा वाटा वाढत आहे. अशीच गुंतवणूक वाढत राहिली तर किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक 18 टक्क्यावर जाण्याची शक्यता आहे.
गेल्या 11 महिन्यात रिटेल गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 44,400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये रिटेल गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडामध्ये तब्बल 1.24 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपी च्या माध्यमातून केली. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात झालेली एकूण गुंतवणूक तब्बल 5.76 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.