मुंबई – बी. साई सुदर्शनचे दमदान नाबाद अर्धशतक व सलामीवीर वृद्धिमान साहा याने केलेल्या उपयुक्त फलंदाजीमुळे आयपीएल स्पर्धेत मंगळवारी गुजरात टायटन्सला पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 143 धावा उभारता आल्या.
गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्या याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुजरातच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. सलामीवीर साहाने शुभमन गिलसह डावाची सुरुवात आक्रमक केली. गिलने 2 चौकार फटकावले मात्र, अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. त्यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले.
साहाने चांगली खेळी केली. मात्र, तो देखील अनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 17 चेंडूत 3 चौकार व 1 षटकार फटकावताना 21 धावा केल्या. कर्णधार हार्दीक पंड्या 1 धाव काढून परतला. त्यानंतर डेव्हीड मिलर व राहुल तेवतिया यांनी साफ निराशा केली. त्यानंतर भरात असलेल्या रशिद खानलाही अपयश आले. दरम्यान साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने त्यानंतर धावांचा वेग वाढवताना संघाला किमान समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्याने आपल्या नाबाद 65 धावांच्या खेळीत 50 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 1 षटकार फटकावला.
प्रदीप संगवान, लियाम लिव्हिंगस्टोन व अल्झारी जोसेफ यांनाही खास कामगिरी करता आली नाही. या स्पर्धेत आतापर्यंत गुजरात संघाने सातत्याने वर्चस्व राखले आहे. त्यांनी 16 गुणांसह यंदाच्या स्पर्धेत प्लेऑफ गटातील स्थानही निश्चित केले आहे. त्यांनी आता त्यांच्या उर्वरीत पाच सामन्यांतील एका सामन्यात जरी विजयाची नोंद केली तरी त्यानंतर स्पर्धेत कीतीही उलटफेर झाला तरी त्यांचे स्थान आबाधित राहणार आहे. पंजाबकडून कागिसो रबाडाने 4 गडी बाद केले. लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन व अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक –
गुजरात टायटन्स – 20 षटकांत 8 बाद 143 धावा. (वृद्धिमान साहा 21, साई सुदर्शन नाबाद 65, कागिसो रबाडा 4-33, लियाम लिव्हिंगस्टोन 1-15, ऋषी धवन 1-26, अर्शदीप सिंग 1-36).