- 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 35 केंद्रावर मिळणार लस
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लसीचा साठा संपल्याने शुक्रवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली होती. आता महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने शनिवारी (दि.3) पुन्हा लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे.
शहरातील 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना 35 केंद्रावर लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण हे कोविन ऍपवर नोंदणी करून स्लॉट बुकिंग केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. शनिवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.
तसेच 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस (84 ते 112 दिवस) शहरातील 28 केंद्रावर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 45 वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी 4 केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी व खेळाडूंसाठी नवीन जिजामाता रुग्णशालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
खासगी लसीकरण केंद्र जोरात
लस नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शुक्रवारी लसीकरण केंद्रे बंद ठेवली होती. यामुळे महापालिकेतर्फे दिवसभरात एकाही नागरिकाला लस देण्यात आली नाही. तर दुसरीकडे खासगी लसीकरण केंद्रांनी मात्र नागरिकांना लस उपलब्ध करुन दिली. दिवसभरात शहरातील 19 खासगी लसीकरण केंद्रांवर 3872 नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली.