कोटा (राजस्थान)- देशाच्या काही भागांमध्ये जातीय संघर्षाच्या घटना घडत असताना राजस्थानातील कोटा येथील मुस्लिम बांधवांनी सामाजिक सद्भावनेचे अनोखे दर्शने घडवले आहे. येथील एका भागातील मुस्लिमांनी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून मिरवणुकीचे स्वागत केले आणि मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबताचे वाटप केले.
खेराबाद परिसरातून ही मिरवणूक जात असताना ती मिरवणूक मशिदीसमोर थांबली तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी मिरवणुकीच्या स्वागताप्रित्यर्थ अनेक मुस्लिम तरुणांनी त्यांचे पारंपारिक मार्शल आर्ट कौशल्य प्रदर्शित केले. ही मिरवणूक दोन मशिदींच्या परिसरांतून गेली.
ताहीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिमांनी मिरवणुकीचे स्वागत केले, पाकळ्यांचा वर्षाव केला आणि त्यात सहभागी झालेल्यांना त्यांनी पुष्पहार अर्पण केला.दोन्ही मशिदींच्या बाहेर मुस्लिम बांधवांनी स्टॉल लाऊन सरबतांचे वाटप केले. संध्याकाळची नमाज अदा केल्यानंतर मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी मुस्लिम मशिदीतून बाहेर पडले.
या अनोख्या स्वागतामुळे त्या भागातील सामाजिक सलोख्याचे वातावरण आणखी दृढ होण्यास मदत झाली. मिरवणुकीच्या आधी दोन्ही धर्मांतील प्रतिनिधींची प्रशासनाने संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्यावेळी दोन्ही बाजूंनी सलोखा बिघडू देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला होता.