नवी दिल्ली – दिल्ली शहरातील जहांगीरपुरी येथे हनुमान जयंती मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे, ज्यात एका उपनिरीक्षकावर गोळी झाडणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. मोहम्मद अस्लम असे त्याचे नाव असून अस्लमकडून एक पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे, हेच पिस्तुल त्याने शनिवारी संध्याकाळी गुन्ह्याच्या वेळी वापरले होते.
दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीच्यावेळी दोन समुदायांमधील संघर्षादरम्यान दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले होते. या हिंसक प्रकारात आठ पोलिस कर्मचारी आणि एक स्थानिक असे एकूण नऊ जण जखमी झाले. गोळी लागल्याने जखमी झालेल्या उपनिरीक्षकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आता जहांगीरपुरी येथील स्थिती नियंत्रणात असून तेथे जादा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.