जामखेड (प्रतिनिधी) – मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याच अनुशंगाने जामखेडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बंदची घोषणा करण्यात आली होती. या बंदला जामखेडमधील सर्व व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवली होती.
जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सकाळपासूनच बंद ठेवली होती. याबाबत मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदला जामखेड शहरासह अनेक गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. दरम्यान, जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठ आसलेल्या मेन रोड, तपनेश्वर रोड, जयहिंद चौक खर्डा चौक, नगररोड, बीड रोड व बसस्थानक परिसरातील दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
जामखेड शहरासह तालुक्यातील खर्डा, तेलंगशी, देवदैठणसह सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर कुठलही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.