Rajya Sabha : राज्यसभेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून (शिंदे गट) कडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत 15 फेब्रुवारी पर्यंत आहे. त्यानुसार या उमेदवारांनी आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल केले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांच्या राजकीय कारकीर्दीबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात…
मेधा कुलकर्णी
मेधा कुलकर्णी या कोथरूड विधानसभेतून आमदार राहिल्या आहेत. 2014च्या निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटेंचा 64 हजार मतांनी पराभव केला होता. 2019 मध्ये मेधा कुलकर्णी यांचं तिकिट कापून ते चंद्रकांत पाटील यांना दिले होते. त्यानंतर ब्राह्मण उमेदवार नसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पुणे महानगर पालिकेत त्या 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याआधी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र तसे होऊ शकले नाही. त्यानंतर आता त्यांना थेट राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली आहे.
अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजप पक्षप्रवेशानंतर त्यांना लगेचच राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे. 1987 मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा अशोक चव्हाण विजयी झाले होते. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून ते संसदेत पोहोचले होते.
1992 मध्ये ते विधानपरिषदेचे सदस्य बनले. 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनले.चव्हाण मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता. कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा चव्हाणांवर आरोप झाला. त्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.
राज्यसभेत अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली तर यामुळे काँग्रेसची मते फोडली जाऊ शकणार, त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला मतदारांचा आकडा वाढवण्यात मदत होणार आहे. यापूर्वी, भाजप पक्षाने विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होताएक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यात ताकद वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. अजित गोपछडे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केली. डॉ. अजित गोपछडे हे भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्षही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करत आहेत. भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे.
चंद्रकांत हंडोरे
दलित पॅंथर संघटनेतून आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला होता. भारिप-बहुजन महासंघ, रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेस असा हंडोरे यांचा राजकीय प्रवास आहे. 1995 मध्ये ते पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1992-93 मध्ये हंडोरे मुंबईचे महापौर झाले होते. सामाजिक न्यायमंत्री पदाची देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याने चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे आपला विजय यावेळी पक्का करणार का? हे पाहावे लागणार आहे.
मिलिंद देवरा
मागील महिन्यात काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिंदे गटाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. मिलिंद यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा आहेत.
देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. मिलिंद देवरा 2004 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेत पोहोचले होते. त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता यांचा 10 हजार मतांनी पराभव केला होता. यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी दक्षिण मुंबईची जागा जिंकली होती. मात्र, मिलिंद देवरा यांना 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्रिपद देखील भूषवलं आहे. पटेल 4 वेळा लोकसभेवर निवडून आले आहे. 2014 पासून ते राज्यसभा सदस्य आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. 2009 ते 2022 पर्यंत भारतीय फुटबॉल नियामक मंडळ आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे ते अध्यक्ष होते.
प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार असून त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र कार्यकाळ संपण्यापूर्वीच पटेल यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.