राज्यभरातून कबड्डी, खो-खो स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग : विजेत्यांना गौरविले
बेल्हे -इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्टस असोसिएशन आणि समर्थ पॉलिटेक्निकच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी आणि खो-खो स्पर्धा नुकत्याच समर्थ शैक्षणिक संस्थेच्या क्रीडा संकुलामध्ये पार पडल्या. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी खेळाडूंनी क्रीडा ध्वजास मानवंदना देऊन संचलन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य अनिल कपिले, प्रा. संजय कंधारे, क्रीडा शिक्षक आणि प्राचार्य एच. पी. नरसुडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खो-खो आणि कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून रत्नागिरी, ब्रह्मपुरी, बीड, नांदेड, सांगोला, इस्लामपूर, वर्धा, मुंबई, वाघोली, नाशिक, अकोला, शिरपूर, खारघर आदी ठिकाणांहून कबड्डीचे 14 आणि खो-खोचे 14 संघ सहभागी झाले होते.
कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरीची लढत विद्यालंकार पॉलिटेक्निक मुंबईबरोबर झाली. यामध्ये महाराष्ट्र पॉलिटेक्निक, रत्नागिरी विजयी ठरले. इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड इंजिनिअरिंग मालेगावविरुद्ध बीव्हीआयटी खारघर यांच्या लढतीत मालेगावचा संघ विजयी झाला. अंतिम सामना महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी विरुद्ध इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ऍण्ड इंजिनिअरिंग माळेगाव बारामती यांच्यामध्ये झाला.
यात महाराष्ट्र पॉलिटेक्निक रत्नागिरी विजयी झाला. खो-खो स्पर्धेत झील पॉलिटेक्निक नऱ्हे विजयी ठरला. शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी यड्राव इचलकरंजी उपविजेता ठरला. पारितोषिक वितरण संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य अनिल कपिले, क्रीडा शिक्षक एच. पी. नरसुडे यांच्या उपस्थितीत विजेत्या संघास व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व संघ व सामन्याची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी क्रीडा शिक्षकांनी घेतली.