इस्लामाबाद –पाकिस्तान मध्ये 9 मे रोजी झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंधित असलेले खटले वेगाने चालवण्यात यावेत. या हिंसक आंदोलनामागील राजकीय पक्षावर आणि या पक्षाच्या नेत्यावर लष्करी कायद्याखाली वेगाने कारवाई केली जावी, अशी मागणी करणारा ठराव पाकिस्तानच्या संसदेमध्ये करण्यात आला आहे.
पाकिस्तान तेहरिक-ए इन्साफ या पक्षाबरोबर या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्यासाठी हा ठराव म्हणजे आणखीन एक मोठा हादरा असणार आहे.
संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी मांडलेला हा ठराव संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमताने मंजूर झाला. दिनांक 9 मे रोजी हिंसक आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्षाने आणि या पक्षाच्या नेत्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन करून लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. यातून लष्कराचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले.
त्यामुळे या हिंसक आंदोलनाला जबाबदार असलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांवर लष्करी कायदा आणि राज्यघटनेनुसार लवकरात लवकर कारवाई केली जावी, असे या ठरावात म्हटले आहे. मात्र, यामध्ये “पीटीआय’ अथवा इम्रान खान यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
संबंधित पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जरी पक्ष सोडून देत असले तरी त्यांच्यावर कारवाई केली जावी, असेही या ठरावामध्ये म्हटले आहे.