तेजस्वी यादवांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा – महेश्वर यादवांचा घरचा आहेर

पाटणा – लोकसभा निवडणुकांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या वाट्याला बिहारमध्ये मोठा पराभव आल्याने पक्षामध्ये दुफळी माजण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. पक्षाचे आमदार महेश्वर यादव यांनी आज पाटणा येथे एका पत्रकार परिषदेद्वारे लोकसभा निवडणुकांमधील पराभवाचे खापर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यावर फोडले असून लोकसभा निवडणुकांमधील पराभवाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महेश्वर यादव यांनी केली आहे.

यावेळी बोलताना, ‘लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर ज्या प्रमाणे काँग्रेस अध्यक्ष्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपला राजीनामा सादर केला होता त्याचप्रमाणे राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या तेजस्वी यादव यांनी देखील काँग्रेस नेतृत्वाकडून काहीतरी धडा घ्यावा आणि आपल्या पदाचा राजीनामा द्यावा’ असं देखील महेश्वर यादव म्हणाले.

बिहारच्या जनतेने घराणेशाहीच्या राजकारणाला सपशेल नाकारले असून आता तेजस्वी यादव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत जनादेशाचा सन्मान करावा. १९९७मध्ये जेव्हा राबडी देवी यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा देखील मी घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला होता. मात्र तेव्हा लालू प्रसाद यादव यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले परंतु त्यानंतरच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फटका बसला होता. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षाने बोध घेऊन आतातरी विरोधी पक्षनेते पदी पक्षातील वरिष्ठ नेत्याला विराजमान करावे अशी मागणी त्यांनी केली.

तत्पूर्वी, १७व्या लोकसभा निवडणुकांचे निकाल राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का देणारे लागले असून लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाला एकही जागेवर यश मिळवता आलेले नाही. अशातच आता पक्षातील नेत्यांनी पक्ष नेतृत्वाप्रती आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवायला सुरुवात केली असल्याने पक्षामध्ये फूट पडते की काय असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये चर्चिला जात आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×