शाहूवाडी तालुक्यातील 40 गावांत भीषण पाणीटंचाई

कोल्हापूर – जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका धनगर वाड्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. अति दुर्गम भागात पसरलेल्या या तालुक्यात अजूनही वाड्यावस्त्यांवर मूलभूत सेवा सुविधा पोहचलेल्या नाहीत. अशाच शाहूवाडी तालुक्यात पाणी अडविण्याच्या योग्य उपाय योजनांचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे या तालुक्यातील 40 गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

शाहूवाडी तालुक्यातील पिशवी परिसरातील पाणलोट क्षेत्रात दरवर्षी सरासरी 1250 मि. मी इतका पाऊस पडतो. परंतु या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून शासन पातळीवर योग्य नियोजन न झाल्यामुळे या पाणलोट क्षेत्र परिसरातील 40 गावांना भीषण पाणीटंचाई सारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 2015 मध्ये जलसंधारणाच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पिशवी परिसरात खर्च करण्यात आला होता. मात्र कामातील त्रुटी आणि निकृष्ठ कामांमुळे पाणी साठवणूक आणि भूगर्भातील पाणी पातळीत झाली नसल्याचे एका खाजगी कंपनीच्या सर्व्हेत म्हणण्यात आले आहे.

शाहूवाडी तालुक्यातील 40 गावांना सध्या पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. या भागातील नागरिक सध्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक स्रोत मधून पाणी साठवत आहेत. गावापासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर पायी चालत जाऊन डोक्यावरून पाणी आणत असल्याचे सर्रास चित्र दिसत आहे. पाण्याचे झरे, ओढे आणि विहिरी मधील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे.

या परिसरातील भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शासन स्तरावर अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे तसेच या परिसरातील नागरिकांमध्ये सुद्धा वॉटर हार्वेस्टिंग साठी पुढाकार घेण्यासाठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेने ही पाणी टंचाई रोखण्यासाठी एका आराखड्यानुसार उपाय योजना केल्याचे दिसत आहे मात्र प्रत्येक्षात यावर कारवाई झाली आहे की नाही? हे तपासून पाहावे लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.