राहात्यात शेतकऱ्यांचा जिल्हा बॅंकेच्या राहाता शाखेसमोर ठिय्या

पीक विम्याचे पैसे न मिळाल्याचे निषेध; आठ दिवसात पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन

राहाता: मुदतीत पिक विमा भरूनही विम्याचे पैसे न मिळाल्याचे निषेधार्थ राहाता येथील जिल्हा सहकारी बॅंकेच्या शाखेसमोर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करून, बॅंकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. आठ दिवसात विम्याचे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संतप्त शेतकरी बांधवांनी यावेळी दिला.

हवामान आधारित प्रधानमंत्री फळ पिक विमा मृग बहार योजनेंतर्गत 2018 साठी तालुक्‍यातील पेरू व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बॅंकेच्या राहाता शाखेत मुदतीत विम्याची रक्कम जमा केली होती. बॅंकेने एसबीआय जनरल लाइफ इन्शुरन्स या कंपनीचा विमा लाभधारक शेतकऱ्यांचा उतरविला होता. इतर राष्ट्रीयकृत बॅंकेत विम्याची रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ झाला, मात्र जिल्हा सहकारी बॅंकेच्या राहाता शाखेतील शेतकऱ्यांना विम्याचे कुठलेच अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांनी यासंदर्भात वेळोवेळी जिल्हा बॅंकेच्या राहाता शाखेतील व नगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली, मात्र प्रत्येक वेळी त्यांना उडवाउडवीचे उत्तर मिळाली. बॅंकेकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.6) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जिल्हा बॅंकेच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलना प्रसंगी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत, बॅंकेच्या दिरंगाई व तांत्रिक दोषामुळे शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू न शकल्याने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच त्यांच्या पगारातून त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना करून द्यावी अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी जवळपास दोन तास बॅंकेसमोर ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाप्रसंगी शेतकऱ्यांनी सांगितले की, हवामानावर आधारित प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून विम्याची रक्कम आम्ही जिल्हा बॅंकेकडे मुदतीपूर्व भरून याबाबतची सर्व पूर्तता केली, मात्र जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केल्याने संबंधित रक्कम विमा कंपनीला मुदतीत न जमा झाल्याने हा प्रश्न उद्भवला असल्याचे सांगितले. बॅंकेच्या या दोषामुळे अनेक शेतकऱ्यांना विमासंरक्षण पासून वंचित राहावे लागले असून, त्यास जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. आम्हाला त्याचे पैसे द्या अन्यथा आम्ही मागे घेणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. त्यानंतर बॅंकेचे अधिकारी शाळीग्राम वाणी यांनी शेतकऱ्यांसमोर बॅंकेची झालेली चूक मान्य करीत दिलगिरी व्यक्त करून, शेतकऱ्यांची माफी मागितली. वाणी म्हणाले, जिल्हा बॅंकेकडून विमा कंपनीला मुदतीत भरणा न झाल्याने व तांत्रिक दोषामुळे ही समस्या निर्माण झाली.

विमा कंपनीने आम्ही शेतकऱ्यांचा भरलेला विमा हप्ता स्वीकारला असून, शेतकरी बांधवांना विमा मिळवून देण्यासाठी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून, त्यावर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. शेतकरी बांधवांना विम्याची रक्कम 100 टक्‍के मिळेल, मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. झालेल्या तांत्रिक दोष या संदर्भात बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह दिल्लीपर्यंत पत्रव्यवहार सुरू असून, यात मार्ग निघणार असल्याचे सांगितले. विमा कंपनीने यासंदर्भात आम्हाला उशिरा संदेश दिल्याने हा प्रश्न उभा राहिला आहे. या प्रश्नासंदर्भात राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सदाशिव लोखंडे यांनीही लक्ष घातले असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेचे कार्यकारी संचालकाशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

आठ दिवसात झालेली चूक दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम वर्ग न केल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी सामुहिकपणे दिला. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल शेळके, गणेश कारखान्याचे माजी संचालक शिवाजी लहारे, माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, भगवान टिळेकर, दत्तात्रय शेळके, विजय वाहने, अनिल गोटे, अजित जोशी, नारायण कारले, मकरंद दंडवते, ऍड. विजय बोरकर, दिलीप सातव आदी शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी सतीश भोंगळे, भिमराज लहारे, भाऊसाहेब सदाफळ, मंजीराम शेळके, उमेश झगडे, मच्छिंद्र गाडेकर, सुनील गाडेकर, प्रदीप कोल्हे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी दादासाहेब गायकवाड यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना फळबाग विमा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावरून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.