पिंपरी – पिंपरी-चिंचड शहरातील एका भटक्या कुत्र्याचे तोंड प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये अडकले होते. आठ दिवसांपासून तो त्या परिस्थितीत फिरत होता. अखरे अग्निशामक दलाच्या रेस्क्यू पथकाने त्याला पकडून, त्याच्या तोंडला अडकलेली बरणी काढून त्याची सुटका केली. आठदिवस अन्नपाणी न मिळाल्याने अशक्त झालेल्या या भटक्या कुत्र्याला जीवदान मिळाले आहे.
पिंपरी चिंचवडमधील किवळे गावातील एका भटक्या कुत्र्याच्या तोंडात प्लॅस्टिकची बरणी अडकली होती. आठ दिवसांपासून तो त्याच परिस्थितीत फिरत होता. तोंडात बरणी असल्यामुळे त्याला काहीच खात, पिता येत नव्हते. त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याची ही परिस्थिती पाहून अनेकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, भीतीमुळे तो कोणाच्या हाती लागत नव्हता.
परिसरातील त्रिशूल मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्याची माहिती मिळाली. त्याला तरुणांनी प्रयत्न सुरू केले आणि त्याला पकडले. त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन पथकाला पाचारण केले. इतक्या दिवसांपासून तोंड बरणीत असल्याने त्याचे तोंड सडू लागले होते. पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्याच्या शरीरात त्राण उरला नव्हता.
बिकट परिस्थितीमुळे अखेर बरणी कापून त्याचे प्राण वाचण्याचा निर्णय घेतला. कुत्र्याला डॉग रेस्क्यू टीमकडे पाठवण्यात आले. रेस्क्यू टीमने त्याला रुग्णालयात नेले. तेथे बरणी कापून काढण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर उपचारही करण्यात आले. येत्या काही दिवसांत कुत्रा बरा होईल, असे पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भटक्या कुत्र्यावर राबवलेल्या या रेस्क्यूमुळे प्राणीमित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.