आठवणीतील प्रजासत्ताक दिन…

26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिवस म्हणून एखाद्या सणाप्रमाणे आनंदाने आणि तितक्‍याच उत्साहाने साजरा केला जातो. आपल्याला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले पण राज्यघटना 26 जानेवारी 1950ला अमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत हे एक मोठे लोकशाही राष्ट्र आहे. लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य… हा अधिकार 26 जानेवारी 1950ला मिळाला आणि तेव्हापासून प्रजेची सत्ता अर्थात लोकशाही पद्धत सुरू झाली. भारतातील सर्व घटक राज्यांमध्ये विविध क्षेत्रातील वैभवशाली दर्शन घडवणारी भव्य मिरवणूक काढली जाते.

आमच्या लहानपणी आमच्या घरातही या दिवशी सणाप्रमाणेच उत्साहाचे आणि अनांदाचे वातावरण असे. घरात गोडधोड केले जाई. आम्ही सर्व भावंडे आदल्या दिवशीच युनिफॉर्म स्टार्च करून इस्त्री करून ठेवीत असू. बुटांना पॉलीश करून ठेवत असू. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्टार्च केलेला निळ घातलेला कडक इस्त्रीचा युनिफॉर्म आणि पॉलिश केलेले चकाचक बूट घालून टॉक टॉक करत रुबाबात चालताना कोण अभिमान वाटे… फारच आनंदोत्सव असे. मी एनसीसीमध्ये आणि माझा भाऊ स्काऊटमध्ये होतो. शाळेत गेल्यावर ध्वजारोहण, ध्वजवंदन होई. त्यानंतर राष्ट्रगीत पूर्ण शाळा एकसाथ, एक आवाजात म्हणत असू.

अक्षरशः अंगावर रोमांच उभे राहात आणि छाती अभिमानाने फुलून येत असे. आम्हा मुलांचे गुण गौरव समारंभ झाल्यावर पाठ केलेले भाषण विद्यार्थी करत. त्यानंतर मुख्याध्यापकांचे भाषण आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर खाऊ वाटप होई. फार मज्जा येई आणि खूप आदरयुक्‍त अभिमान वाटे. त्यानंतर गल्लीगल्लीत सर्वत्र प्रभात फेऱ्या निघत. ध्वजवंदन, राष्ट्रगीत यामुळे देशाप्रती आदरभाव व्यक्‍त होत असे. आमच्या लहानपणी रेडिओवर रनिंग कॉमेंटरी ऐकत असू दिल्लीच्या कार्यक्रमाची. नंतर टीव्ही आले, दूरदर्शन आले आणि प्रत्यक्ष दिल्लीचे संचलन दिसू लागले. एकूण आनंद सोहोळा वाढतच गेला. असा 26 जानेवारीचा दिवस अविस्मरणीय आणि आवडता अभिमानास्पद प्रजासत्ताक दिवस.

अनुराधा पवार

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here