डोक्‍यावरी असु द्यावे शिरस्त्राण

खरंतर मी सुरुवातीला या लेखाला “सिर सलामत तो पगडी पचास’ असंच शीर्षक देणार होते, पण नंतर लक्षात आलं की पगडी हा तर अनेक प्रकारच्या शिरस्त्राणांपैकी एक प्रकार आहे. कारण आदीम काळापासून जेव्हा माणूस शिकार किंवा लढाईत विजय मिळवून यायचा तेव्हा तो आपल्या केसांना मातीचा लेप लावून म्हणजेच आजच्या भाषेत हेअर पॅक लावून तो वाळून कडक होण्यापूर्वीच त्यात वेगवेगळ्या पक्ष्यांची रंगीत पिसे, पानं, फुलं, रंगीत खडे खोवत असे.

कदाचित एखादा चपळ पक्षी मारून आपण शिकार करण्यात किती तरबेज आहोत हे दाखवून शिकार केलेल्या पक्ष्याची पिसे आपल्याच डोक्‍यावर खोवून आपला पराक्रम सगळीकडे मिरवणं हा त्यामागचा उद्देश स्पष्ट होतो. यावरूनच “अ फिदर इन द कॅप’ हा इंग्रजी वाक्‍प्रचार आला आहे! त्यातूनच मग लढाई जिंकलेल्या राजाच्या डोक्‍यावर आपोआपच नैसर्गिक फुला-पानांचा आणि नंतर मौल्यवान धातू-रत्नांचा राजमुकुट चढवला जाण्याची प्रथा निर्माण झाली. राजानं मुकुट घातल्यानंतर त्याच्या प्रजाजनांमध्ये त्यांच्या कामानुसार आणि हुद्यानुसार वेगवेगळी शिरोभूषणे आली.

आज आपण पाहतो ती शिरोभूषणे कपड्यांचाच एक भाग असली तरी त्यांचा उगम मात्र केसांना सुशोभित करणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांमधून आला असल्याचं समजतं. तेव्हा माणसाला किती पूर्वीपासून सौंदर्यदृष्टी होती हे पाहून नवल वाटतं. त्याच काळात प्रतिकूल हवामानापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं माणसानं शिरोवेष्टणे निर्माण केली. शिरोवेष्टणे म्हणजेच थंडी-वारा-ऊन-पाऊस यापासून डोक्‍याचं, चेहेऱ्याचं आणि कानांचं संरक्षण करतील असे कपड्याचे प्रकार. त्यात वेगवेगळ्या देशांत हॅट, कॅप पासून गोशो-सोंब्रेरोपर्यंत अनेक प्रकार येतात, पण भारतासारख्या देशामध्ये प्रतिकूल हवामान नसल्यामुळे आपल्याकडची शिरस्त्राणं ही मुख्यत: वस्त्रांच्या मूलभूत गरजेपेक्षा आपलं सामाजिक स्थान, व्यवसायातला पेशा आणि जाती-धर्मानुसार बदलत गेली. आपल्याकडे पगडीचा उल्लेख अथर्व वेदात सर्वप्रथम केल्याची नोंद आहे. त्यात पगडीला “उष्णीषा’ असं म्हटलंय. त्यानंतर इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात शीर्षपट्ट पगडी, चक्करदार पगडी, हलकी पगडी, शंखाकार पगडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या वापरात होत्या असे उल्लेख आहेत.

अकराव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत भारतात ज्या ज्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं त्या त्या संस्कृतींचा प्रभाव भारतीय पेहेरावावर पडलेला दिसून येतो. त्यानुसार पंजाब, राजस्थान, गुजरात, वायव्य प्रांत आणि दक्षिणेकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पगड्या आणि फेट्यांचा वापर प्रचलित असलेला दिसतो. मुंबई शहर गॅझेटिअर या पुस्तकात तर जयराज साळगावकरांनी वेगवेगळ्या प्रांतातून मुंबईत आलेल्या लोकांचं वेगवेगळ्या कालखंडातल्या पोशाखाबद्दल वर्णन केलं आहे. त्यात त्यांनी संपूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांच्या जवळपास पन्नास ते पंचावन्न प्रकारच्या शिरोभूषणांचं वर्णन करून त्यांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. ते वाचणं फारच रंजक आहे. फक्त महाराष्ट्राचा जरी विचार केला तरी डोक्‍यावर घालायची आणि डोक्‍याला बांधायची अनेक प्रकारची वस्त्रे दिसतात. त्यात पगड्या, फेटे, पटका, मुंडासं, पागोटं, तिवट, मंदिल, बत्ती असे असंख्य प्रकार दिसतात. यात जातीनुसार आणि आपल्या व्यवसायानुसार वर्गीकरण झालेलं दिसतं.

राजे-महाराजांच्या डोक्‍यावरच्या पागोट्यावर तुरा, शिरपेच आणि कलगी असे. यावरूनच कलगी-तुरा या समासाचा उगम झाला असावा. शिवाजी महाराज जिरेटोप वापरत आणि त्यावर मोत्यांचा तुरा असे. तर त्यांचे मावळे मावळी पगडी बांधत असत. संत तुकाराम महाराज साधंसं पांढऱ्या-गुलाबी रंगाचं पागोटं वापरत असत. खरी जर लावून केलेली शिंदेशाही पगडी राजघराण्यातले लोक वापरत होते. आपल्याकडचे मराठा लोक केशरी रंगाचा फेटा बांधत, ब्राह्मण लोक लाल रंगाची बांधीव पगडी घालत असत. शिवाय जोतिराव फुले लाल रंगाच्या कापडाची पगडी बांधत असत. देवीच्या किंवा खंडोबाचे गोंधळी बत्ती पगडी वापरत होते. कोल्हापुरी तुऱ्याचा फेटा तर अजूनही प्रसिद्ध आहे.
याशिवाय पेशवे कालखंडात प्रसिद्ध झालेली पेशवाई पगडी सगळेच पेशवे वापरत असत. लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे हे पुणेरी पगडी वापरत असत. गंमत म्हणजे ही पगडी फक्त पुण्यातच तयार केली आणि विकली जाते. पुण्याबाहेर विकायला याला कायद्यानं मनाई आहे. पुणेकरांनी याचंही पेटंट घेऊन आपला पुणेरी बाणा दाखवायचा इथेही सोडला नाही!

अमृता देशपांडे

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.