मुंबई – आज संबंध देशभरात 73 वा ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी सामान्य जनतेपासून बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील सर्व देशवासियांना 73 व्या ‘प्रजासत्ताक दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. पण यामध्ये बॉलिवूडचे महानायक ‘अमिताभ बच्चन’ चांगलेच ट्रोल झाले आहेत. देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी बिग बींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला.
View this post on Instagram
या फोटोमध्ये त्यांनी झेंड्याच्या रंगांप्रमाणे दाढी आणि मिशी रंगवल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.!’असे कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा हा फोटो व्हायरल झाला आणि त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
एका यूजरने ‘तुमच्याकडून ही अपेक्षा नाही’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही हा फोटो काढून टाका नाही तर दुसरा फोटो शेअर करत शुभेच्छा द्या..’ असं म्हंटलं आहे. दरम्यान, अमिताभ यांच्या या फोटोवर बॉलिवूडच्या अनेक बड्या कलाकारांनी कमेंट्स अँड लाईक केलं आहे.