वाढतोय आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचा आलेख

-मावळ लोकसभा शेवटच्या टप्प्यातील प्रचार
-253 तक्रारींवर निवडणूक विभागाची कारवाई
-ऑनलाइन 243 तर प्रत्यक्षात केवळ दहाच तक्रारी
-ऑनलाइन तक्रारीचा ट्रेंड ठरतोय उमेदवारांसाठी घातक?

शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे प्रचाराचा मोर्चा वळला आहे. उमेदवारांकडून होत असलेल्या प्रचारावर निवडणूक विभागाला बारकाईने लक्ष द्यावे लागत आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत उमेदवारही आचारसंहिता भंग होऊ नये याची काळजी घेत आहेत. मात्र, निवडणूक आयोगापेक्षा जास्त बारीक लक्ष प्रतिस्पर्धी उमेदवारांचे समर्थक ठेऊन असतात. लहान-लहान बाबींची तक्रार ऑनलाईन केली जात आहे. परंतु कित्येक तक्रारी तथ्यहीन असल्याचे पहिल्या टप्प्यात आढळून आले होते.

पहिल्या दोन टप्प्यात म्हणजे दि. 20 एप्रिलपर्यंत निवडणूक विभागाकडे आचारसंहिता भंग केल्याच्या 131 तक्रारी दाखल झाल्या होत्या. यापैकी केवळ 75 तक्रारीमध्ये निवडणूक आयोगाला तथ्य आढळले होते. त्यामुळे 75 प्रकरणांमध्ये नोटीस पाठवून खुलासा करणयाचे आदेश देण्यात आले होते. 56 तक्रारींमध्ये तथ्य न आढळल्याने त्या निकाली काढण्यात आल्या होत्या.

दि. 20 एप्रिलपासून निवडणुकीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. शेवटच्या टप्प्यात मतदारापर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पोहचण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. अवघ्या चार दिवसात निवडणूक विभागाकडे आणखी 122 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारीची शहानिशा करण्याचे काम सध्या निवडणूक विभागाकडून युध्द पातळीवर सुरू आहे. आता, प्राप्त तक्रारीपैकी किती प्रकरणात तथ्य आढळणार, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

ऑनलाइन तक्रारीचा ट्रेंड या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यानंतर ऍप्लिकेशनच्या माध्यमातून थेट ऑनलाईन तक्रार करण्याची सोय केली आहे. त्यामुळे, अनेक जण आता संबंधित घटनेचा व्हिडीओ व फोटो काढून आयोगाकडे ऑनलाईन तक्रार करीत आहेत. आत्तापर्यंत प्राप्त 253 तक्रारी पैकी 243 तक्रारी या ऑनलाईन प्राप्त झाल्या आहेत. तर केवळ 10 तक्रारी या ऑफलाईन पध्तीने सादर करण्यात आल्या आहेत.

पिंपरीमधून सर्वाधिक तक्रारी

आचारसंहितचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 253 तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी पिंपरी विधानसभेतून प्राप्त झाल्या आहेत. पिंपरीमध्ये 92, चिंचवड 86, मावळ 46, उरण 20, कर्जत 6 व पनवेल विधानसभा मतदारसंघातून 3 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी काही तक्रारीची शहानिशा करुन त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. तर काही तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याने संबंधिताना नोटीस पाठवण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.