‘श्रीं’ना 1 कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक

पुणे – मोगऱ्याची आकर्षक सजावट.. विविध फुलांनी सजलेला गाभारा.. फुलांनी मुकुट, कान व पुष्पवस्त्राची केलेली सजावट.. असे गणपतीचे मोहक रूप वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त पुणेकरांना पाहायला मिळाले. “श्रीं’च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरीच्या उटीचे लेपन करण्यात आले होते. यासह गणपतीला मोगऱ्यासह 1 कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासोबत मोबाइल कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सवाचे आयोजन केले होते. पुष्पसजावटीची तयारी दि. 22 पासून सुभाष सरपाले आणि त्यांचे तब्बल 550 सहकारी करत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 1300 किलो झेंडू, 2300 किलो मोगरा यासह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली. गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्ट्य होते.

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने वासंतिक उटीचे भजन करण्यात आले. यावेळी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने यांच्यासह ट्रस्टचे विश्‍वस्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.