अमरावती – प्रख्यात तेलगु अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे आज त्यांच्या निवासस्थानी हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांनी रंगभूमीद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
तेलगु रंगभूमीवर त्यांनी मोठे योगदान दिले आहे. कॉमेडियन व व्हिलन अशा शैलीतल्याही त्यांनी अनेक भूमिका करून त्या गाजवल्या होत्या. रायलसीमा भागातील ढंगाने तेलगु बोलत त्यांनी रंगवलेले अनेक खलनायक सुपरहिट ठरले होते.
त्यांनी सुमारे शंभरावर चित्रपटांमध्ये काम केले आहे. तेलगुबरोबरच कन्नड आणि तामिळी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. चित्रपटसृष्टीत मोठे नाव झाले असतानाही त्यांनी तेलगु रंगभूमीशी असलेले नाते तोडले नव्हते. त्यांनी अनेक दर्जेदार नाटके या रंगभूमीला दिली आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आदी नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.