वॉशिंग्टन – भारत, इस्त्रायल आणि अमेरिका या देशांनी दूरसंचार क्षेत्रातील 5 जी तंत्रज्ञानाच्या संबंधात एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. या तीन देशांमध्ये अनेक प्रकल्पांच्या बाबतीत व्यापक सहकार्याने यापुढील काळात मोठे काम होणार आहे अशी माहिती अमेरिकेच्या युएसएड या संस्थेचे उपप्रशासकीय अधिकारी बोनी ग्लिक यांनी दिली.
त्यांनी सांगितले की विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात हे तीन देश व्यापक स्तरावर एकत्र येऊ शकतात त्याचा लाभ या तिन्ही देशांतील युवकांनाहीं होणार आहे. जगाच्या विकासापुढे निर्माण झालेल्या आव्हानांना भिडण्याची क्षमता या तिन्ही देशांमध्ये आहे आणि या देशांशी एकत्र येऊन काम करण्यात मोठेच थ्रिल आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
5 जी तंत्रज्ञानाबाबत आमची अनेक देशांशी राऊंड टेबल कॉन्फरन्सवर चर्चा झाली आहे त्यात भारत आणि इस्त्रायल या देशांचाहीं समावेश होता ही आमच्यासाठी समाधानाची बाब ठरली असले ग्लिक यांनी सांगितले. सिलिकॉन व्हॅली, तेल अव्हीव आणि बंगलुरू ही तीन ठिकाणे डिजीटल तंत्रज्ञानासाठी कार्यरत असलेली जगातील प्रगत ठिकाणे आहेत.
त्यामुळे या तीन देशांनी एकत्र येऊन डिजीटल व 5 जी तंत्रज्ञानात एकमेकांना सहकार्य करण्यातून अनेक चांगल्या बाबी घडणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. स्कील डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास, नाविन्य, जल, अपारांपारीक उर्जा या क्षेत्रातही आम्ही सहकार्य करण्यास उत्सुक आहोत असेही त्यांनी सांगितले.