मुंबई – प्रसिद्ध मोहिनीअट्टम नृत्यांगना डॉ. कनक रेळे यांचे बुधवारी सकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या आणि त्यांच्या पश्चात पती यतिंद्र रेळे, मुलगा राहुल आणि सून उमा आणि नातवंडे असा परिवार आहे.
आठवडाभरापासून आजारी असलेल्या रेळे यांना उपनगरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. वयाच्या सातव्या वर्षी नृत्याला सुरुवात करणाऱ्या रेळे यांनी मुंबई विद्यापीठातून नृत्य विषयात डॉक्टरेट करण्यासोबतच मुंबई आणि ब्रिटनमध्ये वकील म्हणूनही काम केले होते.
सुमारे आठ दशकांच्या प्रदीर्घ आणि विलक्षण नृत्य कारकिर्दीत, रेळे यांना पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान, एम.एस. सुब्बुलक्ष्मी पुरस्कार आणि इतर सन्मानांनी सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी शोक व्यक्त केला आहे.