श्रीनगर: जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स या संघटनेचे अध्यक्ष सज्जाद गनी लोने यांची आज वर्षभराच्या स्थानबद्धतेतून सुटका करण्यात आली. केंद्र सरकारने काश्मीरसाठीचे कलम 370 हटवण्याच्या घटनेला ऑगस्ट महिन्यात एक वर्ष पुर्ण होत आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांची सुटका करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी त्यांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
लोने हे भाजप-पीडीपी युती सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना सेंटॉर हॉटेलात उघडण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथेच जम्मू काश्मीरमधील अनेक राजकीय नेते व आमदारांना स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे. तथापि, गेल्या फेब्रुवारी महिन्यात लोने आणि पीडीपी पक्षाचे दुसरे नेते वहीद पारा यांना त्यांच्या घरी हलवण्यात आले आणि त्यांना घरातच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.