नवी दिल्ली – ब्रिटन किंवा अन्य देशांमध्ये आश्रय घेतलेल्या पाकिस्तानमधील काही राजकीय असंतुष्टांचे आणि पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांचे लागेबाधे असल्याचे पाकिस्तानने आज कबूल केले. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताझ झाहरा बलोच यांनी काल साप्ताहिक वार्तालापामध्ये ही कबुली दिली. तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या साथीदारावर झालेल्या ऍसिड हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
इम्रान खान यांचे सहकारी आणि पीटीआयचे माजी नेते मिर्झा शहझाद अकबर यांच्यावर गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये ऍसिड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागे पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा दावा प्रवक्त्यांनी फेटाळून लावला. आपल्याच देशाच्या नागरिकांवर परदेशात हल्ले करण्याचे आपल्या सरकारचे धोरण नाही, असे त्या म्हणाल्या.
मात्र काही राजकीय असंतुष्ट नेत्यांचे आणि पाकिस्तानमध्ये सक्रीय दहशतवादी संघटनांचे एकमेकांशी संबंध आहेत, ही गोष्ट खरी आहे, असेही त्यांनी मान्य केले. मात्र त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही.