झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. मागील दोन महिन्यात राज्यात झिकाचे पाच रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजीमध्ये दोन तर पुणे, पंढरपूर आणि कोल्हापूरमध्ये झिकाचा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. पुणे शहरातील येरवडा परिसरातील 64 वर्षीय महिला झिका व्हायरस पॉझिटिव्ह आढळली आहे. सदर महिलेला 5 नोव्हेंबर रोजी ताप आला होता. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने 10 नोव्हेंबर रोजी तपासणीसाठी एनव्हीआय मध्ये पाठविण्यात आले आणि11 नोव्हेंबर रोजी अहवाल झिका पॉझिटीव्ह आला.
शेजारील कर्नाटकमध्येही या आजारांची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहे. वाढता झिकाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झिका रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.
प्रसार कसा होतो?
झिका विषाणूचा संसर्ग हा डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. एडीज डासांमुळं डेंग्यू आणि चिकनगुनिया विषाणू देखील पसरतात. पण हा आजार जीवघेणा नाही. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने लैंगिक संबंध, गर्भाद्वारे संक्रमण, रक्त आणि प्रत्यारोपणाद्वारे, गर्भधारणेदरम्यान, आईपासून रक्त संक्रमण, अवयव प्रत्यारपणाद्वारे होतो.
लक्षणे कोणती?
झिकाची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंग्यूसारखी असतात. ताप, अंगावर पुरळ उठणे, डोळे येणे, सांधे व स्नायुदुखी, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची असतात. ती दोन ते सात दिवसांपर्यंत राहतात. झिकाचे निदान व उपचार नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग निदान संस्था, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे झिकाच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.
उपचार कोणते?
झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही. रुग्णांवर लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोके दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. तसंच, अधिक आराम करण्याचा सल्ला देतात.
अशी घ्या काळजी?
ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यांमध्ये दाखवा. कोणताही ताप अंगावर काढू नका. या आजारासाठीचे सर्वोत्तम निदान व उपचार सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत आहे. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनीही झिकाचे लक्षण असलेले रुग्ण आल्यास त्यांचा नमुना सरकारी यंत्रणेमार्फत पुण्यातील एनआयव्ही येथे तपासून घ्यावे.