मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेले आणि शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले.यानंतर उद्धव ठाकरे गटाने फुटीबाबत न्यायालयाचे दार ठोठावले. यामुळे सध्या शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे.
राष्ट्रवादीसह ठाकरे गटाचे अनेक नेते हे सरकार लवकरच कोसळेल अशी भविष्यवाणी करताहेत. अशात शिंदे सरकार कोसळेल म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचं खळबळजनक विधान ठाकरे गटाच्या नेत्याने केले आहे.
यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनपेक्षित भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा राजकारण चांगले तापले आहे.
अमोल मिटकरी म्हणाले,’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांना भेटायला गेले. तिथून आल्यानंतर त्यांनी स्वत: सांगितलं की शरद पवारांची प्रकृती चांगली आहे. ही माहिती दस्तुरखुद्द एकनाथ शिंदेंनीच दिली. कालची भेट भविष्यात वेगळं काहीतरी देऊन जाईल, याबाबत कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही”, असं मिटकरींनी प्रसारमाध्यमांना सांगितलं.