पुणे – राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण 200 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 5 एप्रिल 2020 रोजी घेण्यात येणार आहे. या पदांसाठी मंगळवारपासून (दि.24) ते 13 जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी, सहायक आयुक्त, उद्योग उपसंचालक, कौशल्य उद्योजकता विभागाचे सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, भूमि अधिलेख उपअधीक्षक, नायब तहसीलदार आदी पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.
पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी 2 ते 4 ऑगस्ट 2020 रोजी होण्याची शक्यता आहे. एकूण 200 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.