आज सोशल मिडीया आणि अत्याधनिक तंत्रज्ञानाच्या युगात जग जवळ येत आहे. मात्र यामध्ये रक्ताची नाती दुरावत आहेत. ज्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले त्यानांच मरणाच्या दारात सोडून पोटची मुले पळ काढत आहेत. ज्या बहिणींने भावाच्या हातावर राखी बांधत सुरक्षेचे वचन घेतले तोच भाऊ तिला बेवारस सोडून देत आहे. अशा अनेक गरजू व निराधार रुग्णांसाठी एम ए हुसैन एक आशेचा किरण झाले आहेत.
आतापर्यंत त्यांनी हजारो बेवारस रुग्णांची सेवा केली आहे. एक पेन विक्रेता ते नामांकित समाजसेवा करणारा अवलिया अशी त्यांनी ओळख निर्माण केली आहे. बेवारस रुग्णांची सेवा करण्याची तळमळ त्यांना या शिखरापर्यंत घेऊन आली. एम ए हुसैन हे वायसीएम रुग्णालयामध्ये अशा गरजू व गरीब रुग्णांची सेवा करतात. त्यासाठी त्यांनी रिअल लाइफ रिअल पिपल नावाची संस्था सुरू केली आहे. आतापर्यंत संस्थेने लाखो रुग्णांना सेवा दिली आहे. त्यांना जेवण देणे, स्वच्छता कऱणे, नातेवाईकांना शोधून देणे, आश्रामात सोय करणे अशा अनेक गोष्टीसाठी संस्था मदत करते. अनेक बेवारस मृतदेहांचे त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत.