लांबचा प्रवास करून आले आणि व्यथित होऊन परतले
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम) मुलाखतीद्वारे (दि. 16 आणि 17 मार्च) रोजी होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव मंगळवारी अचानक रद्द करण्यात आली. यामुळे गडचिरोली, मालेगावसह राज्यातील काना-कोपऱ्यातून आलेल्या सुमारे चारशे परीक्षार्थींनी बुधवारी सकाळीच महापालिका भवन परिसरात मोठी गर्दी केली होती. परीक्षार्थीची गर्दी वाढत असल्याने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या गलथान कारभाराचा या परीक्षार्थींना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यसेविका (एएनएम)या रिक्त पदासांठी 7 मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार 16 व 17 मार्च रोजी आरोग्य सेविका या पदाकरिता थेट मुलाखती चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासकीय कारणास्तव ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंगळवारी (दि.15) सायंकाळी अचानक जाहीर केले.
आदल्या दिवशी घेतला निर्णय
परीक्षा रद्दच करायची होती तर दोन दिवसांपूर्वी जाहीर करणे गरजेचे होते. जेणेकरून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या परीक्षार्थींना याची माहिती मिळाली असती. मात्र, एक दिवस अगोदर परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर केल्याने अनेक परीक्षार्थींना याची माहितीच मिळाली नाही, अशी भावना परीक्षार्थींनी व्यक्त केली. मंगळवारी दुपारी महापालिकेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला परंतु त्यापूर्वीच अनेक परीक्षार्थींनी पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यासाठीचा प्रवास सुरू केला होता. सर्वच परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचल्यावर कळाले की परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षार्थींनी (बुधवारी) सकाळीच महापालिका भवन परिसरात जमा झाले होते.
निवडप्रक्रिया 16 व 17 तारखेला रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये पार पडणार होती. प्रशासकीय कारणास्तव मंगळवारी दुपारी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. सर्वांपर्यंत याबाबतची माहिती पोहचविण्याचा प्रयत्न केला. मात्र परगावच्या काही परीक्षार्थ्यांना याबाबतची माहिती मिळाली नाही. आलेल्या सर्व उमेदवारांची माहिती घेतली आहे. ज्यावेळेस पुढची जाहिरात निघेल त्यावेळी त्यांना प्राधान्याने कळवले जाईल. ही पदे रद्द झाली नाहीत, फक्त प्रक्रिया पुढे ढकलली आहे.
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिं. चिं. महापालिका
नाशिक जिल्ह्यातून आम्ही परीक्षेसाठी आलो आहे. माझे एक वर्षाचे बाळ आहे. त्याला घेऊन मी रात्रभर प्रवास करून सकाळी पिंपरी चिंचवडमध्ये आले आहे. ज्याठिकाणी परीक्षा होणार होती तिथे गेले असता परीक्षा रद्द झाल्याचे समजले. एवढ्या लांबून येऊन आमचा कोणीही सहानुभतीपूर्वक विचार केला नाही.
– ज्योती पवार, परीक्षार्थी, नाशिक.
माझी वयाची मर्यादा दोन महिन्यांनी संपत आहे. जाहिरातीमध्ये फक्त 43 वयाची अट देण्यात आली आहे. आता ही भरती प्रक्रिया पुढे गेली. मी एकल महिला आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे परीक्षा रद्द झाली. मात्र आमचे म्हणणे देखील कोणी ऐकून घेत नाही. अधिकाऱ्यांना काही विचारले तर ते लांब-लांब पळतात.
– कांचन गुंजकर, बुलढाणा.