Peshawar : पाकिस्तानी लष्कराने 5 महिन्यांत केला 504 दहशतवाद्यांचा खात्मा..

पेशावर – पाकिस्तानी लष्कराने देशातील अशांत खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये गेल्या पाच महिन्यांत एकूण ५०४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी जारी केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.
दहशतवाद्यांविरोधातील कारवाईवर देशाच्या सैन्याकडून मिळालेल्या माहितीचे संकलन असलेल्या या अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या पाच महिन्यांत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये टीटीपी आणि हाफिज गुल बहादूर गटाच्या बंदी घातलेल्या संघटनांच्या महत्त्वाच्या कमांडरचा समावेश आहे.
सुरक्षा दलांनी दहशतवादाविरुद्ध केलेल्या जोरदार कारवाईत २०२४ च्या जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यांत खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतात ५०४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. याच कालावधीत १५८ हून अधिक अतिरेक्यांना पैशांची खंडणी, टार्गेट किलिंग, खंडणीसाठी अपहरण आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अतिरेक्यांनी सुरक्षा दलांवर ३९८ हल्ले केले. त्यात २४० निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आणि २०० सुरक्षा जवान शहीद झाले, असे अहवालात म्हटले आहे.
सुरक्षा दल आणि पोलिसांनी संयुक्तपणे ४७९ वेळा कारवाई केली. यादरम्यान जानेवारीमध्ये १०७, फेब्रुवारीमध्ये ७५, मार्चमध्ये ७८, एप्रिलमध्ये १३० आणि मेमध्ये १३२ दहशतवादी मारले गेले. ऑपरेशनमध्ये खैबर पख्तुनख्वामधील २५३ आणि बलुचिस्तान प्रांतातील २५१ अतिरेक्यांना ठार करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे.

