स्त्रिया व पुरूष यांच्यातील वेतनभेद दूर होणार?
नवी दिल्ली, दि. 16 – समान कामासाठी स्त्रिया व पुरूष यांना मिळणाऱ्या वेतनांतील असमानता दूर करण्याच्या तरतुदीचे एक विधेयक केंद्र सरकारतर्फे लवकरच मांडण्यात येईल, असे अधिकृत गोटांतून सांगितले गेले. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने हे विधेयक मांडण्यात येणार आहे.
शेती, चहाचे, कॉफीचे मळे या क्षेत्रात पुरूष कामगारांच्या तुलनेने महिला कामगारांना कमी वेतन मिळते अशा तक्रारी अनेक महिला संघटनांनी केलेल्या आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांच्या व मुलांच्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी मजूर मंत्रालय लवकरच एक खास विभाग स्थापन करणार आहे. खाणी व मळे यातील महिला कामगारांचे मेळावेही मजूर मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात येणार आहेत.
मुंबईजवळ 4 कोटी टन क्रुड
लंडन – केंद्रीय अन्नखात्याचे राज्यमंत्री जनाब शहानवाझ खान यांनी पत्रकारांना असे सांगितले की, अरेबियन समुद्रात जे तेलक्षेत्र अलीकडे सापडले आहे. त्यातून प्रतिवर्षी 4 कोटी क्रुड तेल निघू शकेल असा अंदाज आहे. मात्र, एकूण तेल क्षेत्र 192 मैलांपेक्षा विस्तृत असल्यामुळे जास्तीत जास्त तेल किती मिळू शकेल ते सांगता येणार नाही. मंत्री पुढे म्हणाले, हे तेल उत्तम प्रतीचे आहे. असे तेल लिबियात आढळते.
सुएझ कालवा केव्हा खुला होणार?
कैरो – सुएझ कालव्यापासून इस्रायलने आपली सैन्ये सुरक्षित अंतरापर्यंत माघारी नेल्याशिवाय कालवा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार नाही, असे इजिप्तने जाहीर केले आहे. ही अट किसिंजर यांना कळविली आहे. जहाज वाहतुकीला इस्रायलकडून पुन्हा धोका उत्पन्न होऊ नये, असा हेतू इजिप्तने प्रकट केला आहे.